झाडाझडती✍️विनोद देशमुख
——————————————-
नुसत्या गाजरापेक्षा
‘गाजरका हलवा’ बरा
महानायक अमिताभ बच्चन गरीब नायक असलेल्या बहुतांश चित्रपटांमध्ये (मोलमजुरी करून आलेल्या थकल्याभागल्या मुलाला) त्याची आई आवर्जून म्हणत असते- “बेटा, मै तुम्हारे लिए गरम गरम गाजरका हलवा बनाती हूं।” या संवादामुळेच गाजरका हलवा हा उत्तरेतील गोड पदार्थ भारतभर आणि जगभरही प्रसिद्ध झाला.
(याबद्दल गाजराचा हलवा बनविण्याचा/विकण्याचा धंदा करणाऱ्या बड्या व्यावसायिकांनी तरी अमिताभला काही कोटी रुपये जाहिरातीच्या दरानं दिले पाहिजे की नाही)
तर, हा गाजराचा हलवा काल पुन्हा चर्चेत आला. पण यावेळी अमिताभ नव्हे, तर एका राजकीय नेत्यानं हा विषय छेडला. माजी मुख्यमंत्री आणि मविआचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल गाजराच्या हलव्याची आठवण काढली. भाजपा-शिवसेना युतीच्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर झाल्याबरोबर, त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले- “आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजराचा हलवा आहे.
समाजाच्या सर्व स्तरांना मधाचं बोट दाखविण्यात आलं आहे.” ही हलव्याची उपमा त्यांना कशी काय सुचली, देव जाणे. पण यातून, आपण अर्थसंकल्पाला गोड ठरवत आहोत, हे ते विसरले जसं, स्वत: मुख्यमंत्री बनू नये हे विसरले, मुलाला मंत्री करू नये हेही विसरले, विधानसभेचा सामना न करताच मुख्यमंत्रिपद सोडू नये हे तर साफ विसरले.
(या तीन महत्त्वपूर्ण घटनांमुळेच महाराष्ट्रात एकाच वेळी रामायण अन् महाभारत घडलं आहे.) गाजराचा हलवा नव्हे, फक्त गाजर म्हटलं पाहिजे अन् मधबिध म्हणूच नये हे विसरल्यामुळे ते अर्थसंकल्पाचं कौतुक तर करीत नाही ना, असा आभास निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष त्यांच्या मनातलं त्यांना स्वत:ला किंवा फारतर संजय उवाचला तेवढं माहीत असणार.
हा अर्थसंकल्प शिंदेंच्या शिलेदारानं मांडला असता तर, ठाकरे असंच ‘गोड’ बोलले असते का ? फडणवीसांचा असल्यामुळे त्यांनी गाजराला साखर लावली अन् मधाची बाटलीही उघडली, अशीही कुजबुज कानावर येत आहे. खरं-खोटं देव, ठाकरे, राऊत किंवा आणखी कोणी कोणी जाणे एक मात्र खरं. कोणालाही फक्त गाजर दाखवण्यापेक्षा गाजराचा हलवा खाऊ घालणं केव्हाही चांगलं. नुसतंच तोंडाला पाणी सुटण्यापेक्षा त्याच्या पोटात काही तर जातं. मविआ सरकारच्या तीन अर्थसंकल्पांमध्ये आपण काय केलं- गाजर तरी दाखवलं होतं का, याचं (अत्यंत कठीण असलेलं) आत्मपरीक्षण करून घ्या राजेहो