देवबोळी तलावातील हजारो मासे मृत्यूमुखी ◼️परिसरात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
गोंदिया, : शहरातील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळील देवबोडी तलावात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना आज, (दि. १८) उघडकीस आली. परिसरात दुर्गंधी पसरल्याने हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्याप्रमाणात माशांचा मृत्यू उष्णतेमुळे की दूषित पाण्यामुळे यावर परिसरात चर्चा रंगली आहे.
शहरातील छोटा गोंदिया परिसरात विठ्ठल रुक्माई मंदिर जवळ जुने देवबोळी तलाव असून तलावात सर्वत्र पानवेली पसरलेली आहे. असे असतानाच गोंदिया शहरातील सांडपाणी देखील या तलावात सोडण्यात येत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणने आहे. तर त्यामुळेच या तलावातील संपूर्ण पाणी दूषित झाल्याचे सांगण्यात आले. येथील नागरिकांच्या मते दूषित पाण्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याची तक्रार अनेक वेळा स्थानिक नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यातच आज, तलावातून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी सुटल्याने स्थानिकांनी तलावाची पाहणी केली असता शेकडो मासोळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
विशेष म्हणजे, या मृत माशांना दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले आहे. दरम्यान, तलावाची स्वच्छता करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली असतानाच २४ तासात प्रशासनाने यावर उपाययोजना न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
◼️नेमके कारण काय?…
स्थानिकांच्या मते दरवर्षीच उन्हाळ्यात या तलावातील शेकडो माशांचा मृत्यू होतो. तेव्हा माशांचा मृत्यू नेमका दूषित पाण्यामुळे की उष्णतेमुळे नेमके कारण काय? या विषयी परिसरात चर्चा रंगल्या आहे.