डॉ. मनीष गवई महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी..!
अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले नियुक्तीचे पत्र
नागपूर : अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा आंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष गवई यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली. अमरावतीचे जिल्हाधिकरी सौरभ कटियार यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान केले. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यांनी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या २० ते २५ वर्षांपासून केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव, विश्व शांतीकरिता युवा विचारप्रणालीकरिता
आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या विषयाला घेऊन त्यांनी चीन, नेपाळ, थायलंड, भूतान, रशियासह सार्क देशात युवा शक्तीकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून, त्यांनी राष्ट्रबांधणीत, राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्रीकरिता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे ते सर्वात कमी वयाचे युवक आहेत. त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक पुढच्या पाच वर्षासाठी करण्यात आली आहे.