घरफोडी करणारा अट्टल चोरटा जाळ्यात
◼️शहर पोलिसांची कारवाई
◼️15.33 लाख रुपयांचे दागीणे हस्तगत
गोंदिया, : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका घराचे कुलूप तोडुन 20 लाख रुपयांची घरफोडी करणार्या अट्टल चोरट्यास गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून 15.33 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.साहील उर्फ माट्या राजु आंबेकर (रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, शहरातील सिव्हील लाईन परिसरातील फिर्यादी मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला (वय 45) हे 9 मार्च 2024 रोजी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे समोरील दाराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन आलमारीत ठेवलेले सोण्याचे दागिणे 55 तोळे, टॅब व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 74 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यान्नी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारी वरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गुन्ह्याचे स्वरूप पाहता सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा तात्काळ शोध घेवून जेरबंद करण्याचे निर्देश होते.
वरिष्ठांचे आदेश निर्देशान्वये नमूद घरफोडी गुन्हातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरिता पोलीस ठाणे गोंदिया शहर, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ची विविध पथके तयार करून नेमण्यात आली होती. घरफोडी झालेल्या गुन्हाचे घटनास्थळ शेजारील तसेच सदर मार्ग परिसरातील जवळपास 200 च्या वर सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासण्यात आले. एकंदरीत सी. सी. टी. व्ही. फुटेज आणि गोपनीय माहितगार आणि गोपनिय सुत्राच्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा अट्टल चोरटा आरोपी साहील उर्फ माट्या राजु याने चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा येथे खून केल्याने त्यास वर्धा येथील गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली होती. त्यामुळे गोंदिया शहर पोलीसांनी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन येथे जावुन खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी हा गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा केलेला आरोपी असल्याने अट्टल चोरटा नामे- साहील उर्फ माट्या राजु आंबेकर यास घरफोडी गुन्ह्यांत ताब्यात घेवून घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन चौकशी व तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे राहते घराची चंद्रपुर येथे जावुन घरझडती घेतली असता नमूद घरफोडीचे गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे.
◼️जप्त केलेला मुद्देमाल…
पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता 2 जोडी सोन्याचे कंगन, 8 नग सोन्याच्या बांगड्या, 2 जोडी सोन्याचे झुमके, 3 नग सोन्याचे अंगुठी, 3 सोन्याचे हार, 2 सोन्याचे चैन,
सोन्याचे पौलीश केलेले 3 नग हार,सोन्याचे पॉलीश केलेली 1 आंगठी, सोन्याचे पॉलीश केलेले झुमके, 6 नग पांढऱ्या रंगाचा बेनटेक्सच्या आंगठ्या असा एकुण 15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे.
◼️विविध पोलीस ठाण्यात 25 गुन्ह्यांची नोंद
अटक करण्यात आलेला आरोपी साहील उर्फ माट्या राजु हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे- 4, रामनगर येथे 8, राजुरा येथे – 2, चंद्रपूर शहर येथे – 9 , गुन्ह्यांची नोंद असून, वर्धा रेल्वे येथे खुनाचा एक गुन्हा तसेच गोंदिया येथे घरफोडीचा एक अशा 25 गुन्ह्यांची नोंद आहे.