गोरेगावातही आव्हाडांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचा एल्गार
◼️छायाचित्राला जोडे मारून व्यक्त केला संताप : तहसीलदारांना निवेदन
गोंदिया : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडले. याच्या निषेधार्थ आज, (दि. ३१ मे) गोरेगाव भाजपा तालुका व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आक्रमक भूमिका घेत भाजपा तालुका कार्यालय परिसरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष विश्वजित डोंगरे यांनी केले. दरम्यान, स्थानिक तहसीलदार विशाल सोनवने यांना निवेदन देण्यात आले.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ मनुस्मृति दहन आंदोलन करतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडले होते. याविरोधात भाजपा तर्फे आक्रमक भूमिका घेत गुरुवारपासून संपूर्ण जिल्ह्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने काल जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा व सालेकसा, देवरी तर आज, शुक्रवारी गोरेगाव येथे आंदोलन करण्यात आले. तेथील भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करुन घोषणाबाजी केली.
त्यानंतर आव्हाडांच्या पोस्टरवर जोडे, चप्पलाने मारुन निषेध नोंदविला. या आंदोलनात अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विश्वजित डोंगरे, जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष संजय बारेवार, पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, जि.प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष पुष्पराज जनबंधु, पं. स. सदस्य रामेश्वर महारवाडे, जि.प. सदस्य शैलेश नंदेश्वर, तालुका उपाध्यक्ष नितिन कटरे, महामंत्री सतिश रहांगडाले, राजेंद्र शहारे, किशोर मेश्राम, दुर्योधन नंदेश्वर, दिपक बोपचे, माणिक भगत, ब्रिजलाल पारधी, सरपंच सोनाली साखरे, केसरीचंद मेश्राम, सागर कटरे, तेजेश्वरी टेकाम, सलिम खॉं पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.