गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज राहणार 3 दिवस बंद
◼️सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान कामबंद आंदोलन
गोंदिया : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 3 दिवस बंद ठेवून शासनाचे ध्यानाकर्षण करण्याचा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंच ज्यांनी ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले, गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अशा सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकशाही तथा पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजेत यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असे गंभीर प्रश्न पडू लागले आहेत. अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे अशी सरपंच संघटनेची मागणी आहे.
दरम्यान, न्यायमागण्यांसाठी तथा सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 दरम्यान 3 दिवस गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, सचिव ऍड. हेमलता चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले, उपाध्यक्ष मनीष गहेरवार यांनी दिली आहे.
◼️हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या…
लोकशाहीसह पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या या घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठीच सरपंच संघटना ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करत आहे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सरपंचांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, सरपंचांना विमा संरक्षण देण्यात यावे, मृत सरपंचाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
–चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना गोंदिया.
०००००००००