गोंदियाच्या कुंभारे नगरात युवकाचा खून
◼️एक आरोपी अटकेत एक फरार
गोंदिया : जुन्या वैमन्यासातून एका युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करुन खून केल्याची घटना मंगळवार (ता.18 ) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास शहरातील कुंभारे नगर येथील आंबेडकर भवन परिसरात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याचा उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र, त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
दद्दू उर्फ उज्वल निशांत मेश्राम (वय 17 वर्षे, रा. भीमनगर) असे मृत युवकाचा नाव असून अंकित घनश्याम गुर्वे (वय 22 वर्ष रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, शिव मंदीर जवळ, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तर राहुल प्रशांत शेंडे (21 वर्ष रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया) असे फरार आरोपीचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मृतक दद्दू उर्फ उज्वल यास आंबेडकर भवन, कुंभारे नगर परिसरात अंदाजे 20 ते 22 वर्षाचे अनोळखी इसमांनी संगनमत करून अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी मृताची बहिण फिर्यादी मंजू निशांत मेश्राम (वय 32 वर्ष रा. भीमनगर, मैत्रेय बुद्ध विहार चे मागे गोंदिया) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम 302, 34 भादंवि अन्वये आज, बुधवार 19 जून रोजी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.चंद्रकांत सुर्यवंशी, यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण पथक अशी विविध पथके नेमण्यात आली. दरम्यान, आरोपींचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती, परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अंकित गुर्वे यांस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा साथीदार फरार आरोपी राहुल शेंडे दोघांनी मिळून मृतक यास जुन्या भांडणाच्या कारणावरून वैमनस्यावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने छातीवर वार करून जिवे ठार केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.
◼️यांनी केली कारवाई…
वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वातील पथक सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, विनोद गौतम, घनश्याम कुंभलवार, लक्ष्मण बंजार तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातनेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरिक्षक थेर, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली.
००००००००००००