खातियात निर्घृण खून : आरोपीला जन्मठेप
◼️ जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
◼️ 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला
गोंदिया : क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणार्या युवकावर धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, (ता.6 ) दिलेल्या निकालात आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शुभम उर्फ बालु संतोष डोंगरे (रा.खातीया, ता. जि. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी 3 मार्च 2021 रोजी तालुक्यातील खातिया येथे आरोपी शुभम उर्फ़ बालू डोंगरे याचे घरी वाढदिवसाच्या पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रात्री 9:15 वाजताच्या सुमारास आरोपीच्या एका मित्राने शेजारील मृतक सुनील डोंगरे यांच्या अंगणात उलटी केली. यावेळी मृत सुनील यांनी त्यास हटकले असता आरोपी शुभम याने ‘तू कोण होता है बोलने वालाʼ असे बोलून मृत सुनील यांच्या पोटावर व छातीवर लोखंडी चाकूने वार करून त्यास जीवानिशि ठार केले. या प्रकरणी मृतकाची पत्नी रेखा यांच्या तक्रारीवरून रावनवाडी पोलीस ठाण्यात 4 मार्च 2021 रोजी अपराध क्रमांक 71/2021 कलम 302 भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा रितसर तपास करण्यात आला. गुन्ह्यात आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे,
परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात तपासाअंती दोषारोप न्यायास्तव सादर करण्यात आले. गुन्ह्याचे केस क्रमांक 53/2021 अन्वये न्यायालयात खटला चालविण्यात आला. या प्रकरणात गुन्ह्याच्या सुनावणीत युक्तिवादानंतर सबळ साक्ष पुरावे, परिस्थिती जन्य पुराव्यावरून आरोपी विरूध्द दोष सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदियाचे न्यायाधिश खोसे यांनी खटल्याचा न्यायनिवाडा करत आज, 6 जुलै रोजी आरोपी शुभम उर्फ बालु संतोष डोंगरे यास भा. दं. वी. कलम 302 मध्ये जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. विशेष म्हणजे सदर गुन्ह्यात सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता सतिश यू. घोडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करून सरकार पक्षातर्फे खटल्याची बाजु मांडली.
◼️यांनी केला होता तपास…
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरिक्षक उमेश पाटील, पोलीस हवालदार संजय चौव्हाण यांनी उत्कृष्ट तपास केला असुन पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या योग्य मार्गदर्शनात पोलीस शिपाई यादोराव कुर्वे यांनी मा. न्यायालयात गुन्ह्याचे पैरवी कामकाज पाहीले.
००००००००००